Sunday, 19 June 2016

कृषी जैवतंत्रज्ञान विषयातील उच्च शिक्षित तज्ञ मानवीय संसाधनांचा तुडवडा कसा सोडवणार?

महाराष्ट्रामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान विषयातील उच्च शिक्षित तज्ञ मानवीय संसाधनांचा दुष्काळ असताना, त्याउलट बोलाचाच भात आणि बोलाच्याच शिळ्या कढीला ऊत आणणारे कृषी जैवतंत्रज्ञाना विरुद्ध बोलणारे असंख्य झाले आहेत. यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो सरकारच्या धरसोड धोरणांचा. महाराष्ट्र सरकारचे जैवतंत्रज्ञान बद्दलचे धोरण अजूनही स्पष्ट नाही, त्यामुळे त्या विषयात शैक्षणिक कारकीर्द करण्यात नवी पिढी चाचपडत आहे. अन्नधान्य कमी पडले तर ते आपण आयात करू शकतो परंतु तज्ञ मानवीय संसाधन हे आपण आयात करू शकत नाही, ते जोपासण्यासाठी फार दूरदृष्टीची गरज आहे. राज्यात कृषी व संशोधन शिक्षणाची धुरा हि चार कृषी विद्यापीठांवर आहे. दर वर्षी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे ही संस्था ‘ऑनलाईन पद्धतीने’ कृषी व कृषीसलग्नित पदवी (बी.एस्सी), पदव्युत्तर (एम. एस्सी) व आचार्य पदवी (पी. एच. डी.) साठी सामायिक प्रवेश प्रक्रिया राबवते.  प्रवेश प्रक्रियेतील कृषी जैवतंत्रज्ञान विषयातील शैक्षणिक कारकीर्द करण्याच्या उपलब्ध संधींचा आढावा जर घेतला तर, ह्या क्षेत्रातील महाराष्ट्रचे मागासलेपन भविष्यातही सुधारण्याची चिन्हे दिसत नाही. महाराष्ट्रात चारही विद्यापीठ अंतर्गत कृषी जैवतंत्रज्ञान विषयातील पदवी (बी.एस्सी) साठी अठरा महाविद्यालयात १०८० विद्यार्थी , पदव्युत्तर (एम. एस्सी) साठी चार विद्यापीठात फक्त ३२ विद्यार्थी व आचार्य पदवी (पी. एच. डी.) साठी फक्त डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला विद्यापीठात ३ विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, प्रवेशसाठी उत्सुक विद्यार्थी व उपलब्ध जागांचे हे गुणोत्तर भयावह आहे. कृषी जैवतंत्रज्ञान पदव्युत्तर (एम. एस्सी) अभ्यासक्रम चालू करण्यासाठी कृषी विद्यापीठ सलग्नित खाजगी महाविद्यालयांनी प्रस्ताव केले असता, मागील सरकारप्रमाणे ह्या सरकारनेदेखील ते नाकारले आहे. हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यासाठी ह्या प्रस्तावांचा पुनः विचार करून सकारात्मक पाऊले उचलावीत. त्यातही झटपट आर्थिक व सामाजिक स्थर्य प्राप्त करून देणाऱ्या महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमुळे कृषी जैवतंत्रज्ञान विषयातील पदवीधर हा पदव्युत्तर किंवा आचार्य पदासाठी लागणाऱ्या परीक्षांकडे पाठ फिरवतो, अशा व अनेक विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी प्रोत्साहन देणारी कोणतीही शिष्यवृत्ती, योजना व धोरण महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. त्यामुळे जरी महाराष्ट्र सरकारने चार विद्यापीठांच्या अंतर्गत “राज्य स्थरीय कृषी जैवतंत्रज्ञान केंद्रे” स्थापन केली असली, परंतु सद्यस्थितीला बोटावर मोजण्या इतपतच कृषी जैवतंत्रज्ञान विषयातील शास्रज्ञ कार्यरत असून त्यांच्यावर संशोधानाव्यातीरिक्त जीएम पिकांच्या प्रक्षेत्र चाचण्या व प्रस्थाव, सल्लग्नित महाविद्यालयांच्या शैक्षणिक कामांचा मोठा बोजा आहे. त्यामुळे भविष्यात खाजगी कृषी जैवतंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत कंपन्यांशी झुंज देऊन सरकारी बियाणे शेतकर्यांना कमी किमतीत पुरवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ विद्यापीठांमध्ये कितपत उपलब्ध किंवा तयार आहेत यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यासाठी खाजगी कृषी जैवतंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत कंपन्यांना महाराष्ट्रातून हाकलून लावले म्हणजे स्पर्धा जिंकली असे घोषित करणे कितपत योग्य ठरेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.